Typing Mistake in MVA Nana Patole on Sanjay Raut : महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. आतापर्यंत काँग्रेसने ९९ ते १०० उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ८४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूरमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादातून आता पुन्हा एकदा संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या ठिणगी पडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी संजय राऊतांना प्रेमाचा सल्लाही दिला आहे.

दक्षिण सोलापूर येथून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अमर पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे. २४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्मही दिला. परंतु, काँग्रेसने काल (२७ ऑक्टोबर) जाहीर केलेल्या यादीत दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या यादीतही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. आता मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात.”

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : “माझ्या विरोधातील उमेदवार तगडा…”, अर्ज भरायला निघालेल्या अजित पवारांची प्रतिक्रिया!

तसंच, नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला फक्त एकच जागा देण्यात आली आहे. यावरूनही संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीनाट्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, “कोकणात आम्हालाही जागा मिळाली नाही. संजय राऊतांनी हा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. मला असं वाटतं की संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे असा प्रेमाचा सल्ला आहे.”

हायकमांडने घेतलेल्या निर्णयावर मी प्रतिक्रिया देणार नाही

सोलापूर दक्षिणच्या कथित टायपिंग मिस्टेकबाबत नाना पटोले म्हणाले, “आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्या पातळीवर ती चर्चा होईल. असं मला वाटतं, राज्य म्हणून प्रतिक्रिया देणार आहे.”

दरम्यान, काल (२७ ऑक्टोबर) काँग्रेसने त्यांची नवी यादी जाहीर केली. या यादीतून त्यानी दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केली. तसंच, अंधेरी पश्चिममधील उमेदवार काँग्रेसने एका दिवसांत बदलला. आधीच्या यादीत या जागेवरून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, ते वांद्रे पूर्वसाठी इच्छूक होते. सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची अंधेरी पश्चिमची जागा अशोक जाधव यांना देण्यात आली.