धाराशिव : दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “सुनील शेळके धमक्या देण्यात व्यस्त आहेत, त्यांनी जरा…”, खासदार सुप्रिया सुळेंचा टोला

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळून त्यावेळी मतदारांनी नवा पर्याय निवडला. आताही त्याच घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. आमदार, खासदारांना तुम्ही विकत घेतले असेल. मात्र महाराष्ट्रातील जनता ही विकावू नाही. ही जनता तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. तुळजाभवानी देवीच्या पावन परिसरात आलो आहे.

हेही वाचा >>> “जयंत पाटील पक्षातून गेले तर…”, आमदार सुनील शेळकेंचा रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांबाबत मोठा दावा

जगदंबेची शपथ घेवून सांगतो, अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचे कबुल केले होते. आता ते खोटे बोलत आहेत. तुळजाभवानी देवीच्या साक्षीने या खोटारड्या सत्ताधार्‍यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची शिक्षा म्हणून मुख्यमंत्री पदावरून आपल्याला हटवले का, असा सवालही उपस्थित केला. भाजपाचे हिंदूत्व घर पेटविणारे आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देशातील सगळे पक्ष भाजप संपविणार असल्याची घोषणा करत सुटले आहेत. परंतु पाचशे बावनकुळे उतरवले तरी पक्ष संपणार नाही. यावेळी ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला धोंड्या असे संबोधत, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेतले. धार्मिक प्रचार न करण्याची सूचनाही केली. परंतु रामलल्लाचे मोफत दर्शन देण्याची घोषणा हा धार्मिक प्रचार नव्हे का? तसेच नार्वेकर यांनी दिलेला निकाल पक्षपाती नव्हता का? आताचा मुख्यमंत्री घटनाबाह्य नाही का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt chief uddhav thackeray offer nitin gadkari to join maha vikas aghadi ahead of lok sabha poll zws
Show comments