“महाराष्ट्रात भाजपाची ओळख करून देण्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पण भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांचं नाव समाविष्ट केलं, पण नितीन गडकरींना वगळलं. भ्रष्टाचाराने बरबटलेला व्यक्ती, असा आरोप भाजपानेच कृपाशंकर सिंह यांच्यावर केला होता. त्या कृपाशंकर यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या यादीत आहे. पण गडकरींचं नाव नाही. गडकरींना दोन दिवसांपूर्वी आवाहन केले होते. तेच पुन्हा एकदा करेन. तुमचा भाजपामध्ये अपमान होत असेल तर लाथ मारा भाजपाला आणि महाविकास आघाडीत या. आम्ही तुम्हाला जिंकून आणतो”, असं आवाहन उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आगामी लोकसभा निवडणूक आमचेच सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आताच्या सरकारमध्ये तुम्हाला केवळ मंत्रिपदाची खूर्ची दिली गेली होती. तर आमच्या सरकारमध्ये तुम्हाला अधिकारासह मंत्रिपदाची खूर्ची देतो. पण तुम्ही महाराष्ट्राचे पाणी काय असतं ते दाखवून द्या. मोदींसमोर झुकण्याची गरज नाही. तुमचं नशीब मोदींच्या हातात नसून तुमच्या हातात मोदींचं नशीब आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

मोदींनी जुमल्याचे नावच ‘मोदी की गॅरंटी’ केले, यवतमाळात उद्धव ठाकरे बरसले

यवतमाळ दौऱ्यावर असताना पुसद येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरेही मंगळवारपासून दोन दिवस विदर्भातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी यांचा हा मतदारसंघ असून, चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा पार पडणार आहेत. २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ४ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वाशिमला भेट दिली होती.

संजय राठोड, भावना गवळींना केलं लक्ष्य

पुसदच्या सभेत उद्धव ठाकरेंनी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. इथल्या खासदारावर भाजपाने भ्रष्टाचाराने आरोप केले होते. मग त्यानंतर विकासासाठी खासदार महिला भाजपामध्ये गेल्या आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राखी बांधली. भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी मोदी गॅरंटी दिली गेली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी दिली.

भाजपामध्ये पाच-पंचवीस कोटींच्या भ्रष्टाचाऱ्यांना किंमत नाही. तिथे ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं जातं, असंही ते म्हणाले. भाजपानेच अजित पवार यांच्यावर ७० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. चार दिवसांत अजित पवार उडी मारून भाजपाबरोबर गेले आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. विचार करा ७० हजार कोटींचा घोटाळा केलेला माणूस उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्र्यांची किंमत काय असेल? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt faction uddhav thackeray slams pm narendra modi and bjp over lok sabha ticket denied to nitin gadkari kvg