रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचा फटका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांना विधानसभा निवडणुकीत बसल्याची चर्चा रंगू लागली आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर जावून साळवी यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी राजन साळवी यांनाच झापल्याने राजन साळवी यांचे भाजपात जाणे आता जवळपास निश्चीत झाले आहे.
हेही वाचा >>> Supriya Sule : “…आता हेडलाईन करु नका नाहीतर मला जोडे बसतील”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता ढवळुन निघण्यास सुरुवात झाली आहे. राजापुर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांना पाडण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनीच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना मदत केल्याचा आरोप माजी आमदार राजन साळवी यांनी केला आहे. किरण सामंत, उदय सामंत यांच्या बरोबर माजी खासदार विनायक राऊत यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी राजन साळवी यांना विधानसभेत पाडण्यासाठी मदत केल्याने राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला असा आरोप साळवी यांनी केला आहे. मात्र लोकसभेत विनायक राऊत यांना पाडण्यासाठी माजी आमदार राजन साळवी यांनीच विद्यमान खासदार नारायण राणे यांना मदत केल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राजन साळवी यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडण्यात आल्याचे आता समोर आले आहे.
हेही वाचा >>> Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक
रत्नागिरी जिल्ह्यातील या पाडापाडीच्या राजकारणाचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला सहन करावा लागला आहे. मात्र या सर्व नाराजी आणि पाडापाडीच्या राजकारणामुळे रत्नागिरीतील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले असून आता माजी आमदार राजन साळवी कोणता निर्णय घेतात? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहीले आहे. नाराजी नाट्यानंतर मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या राजन साळवी यांच्यावरच ठाकरे यांनी आगपाखड करुन पानउतारा केल्याने आता माजी आमदार राजन साळवी शिवसेना सोडणार हे आता निश्चीत मानले जात आहे. मात्र ते शिवसेनेतून बाहेर पडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.