Sanjay Raut on Nitin Deshmukh claim: “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यापुढे जाऊन आणखी धक्कादायक विधान केलं आहे. धुळे जिल्ह्याच्या दौऱ्याव असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नितीन देशमुख यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “अनेक आमदारांना खाण्यातून, औषधातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यांना बधिर करण्यात आलं. नितीन देशमुख यांना तर मारण्याचा प्रयत्न झाला. ते रुग्णालयातून पळून आले होते.”

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, अनेक आमदार सुरत, गुवाहाटीला गेल्यानंतर चार पाच दिवस गुंगीत होते. आमदार ज्या ठइकाणी राहत होते, त्याठिकाणच्या किचनचा ताबा दुसऱ्या लोकांनी घेतला होता. आमदारांचं म्हणणं होतं की, आम्हाला खाण्यातून आणि पेयाद्वारे काही तरी दिलं जात होतं. सात-आठ दिवस आम्हाला काहीच कळलं नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमचेकडे पुरावे नाहीत. पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचं की, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते गुंगीत आहेत. शुद्धीवर नाहीत.

हे वाचा >> MLA Nitin Deshmukh : “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, हृदयविकाराच्या झटक्याची बातमी…”, ठाकरेंच्या आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

व्होट जिहाद हा फेक नरेटिव्ह

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात लोकसभेला व्होट जिहाद झाल्याचा दावा केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, व्होट जिहाद हा प्रकार फेक नरेटिव्हचा असून आरएसएस आणि भाजपाकडून तो समोर केला जात आहे. भाजपच्या दृष्टीने ते निवडणुकीत पराभूत झाले की व्होट जिहाद आणि एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो व्होट जिहाद होत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

या देशांमध्ये सर्व जाती, धर्माचे मतदार आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. तुम्ही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे का? इतरांनी मोदींना मतदान केलं तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता. मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं तर व्होट जिहाद झाला का? जे मोदींना मतदान करतात, तेच मतदार आहेत. बाकीचे मतदार नाहीत का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीतच काढून या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाशिमच्या दौऱ्यावर आले असून स्थानिक आमदार इंद्रजीत नाईक यांना आमंत्रण दिलेले नाही. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “आमचे खासदार संजय देशमुख यांनादेखील आमंत्रण दिलेले नाही, कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारी कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी येतात. तुम्ही प्रधानमंत्री संपूर्ण देशाचे आहात, एका पक्षाचे नाही. जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा. सगळी सरकारची यंत्रणा वापरून भाजपचा प्रचार होत असेल तर निवडणूक आयोगाने या संदर्भात भारतीय जनता पक्षावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकारी पैशांनी प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करीत आहेत त्या भागातील लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बोलवत नाही ही भाजपाची दादागिरी आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.