Devendra Fadnavis Resignation : लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रात भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. राज्यात काँग्रेसनंतर भाजपा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. सरकारमधून बाहेर पडून विधानसभेची तयारी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. यानंतर आता उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी?
“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची विनंती करणे, म्हणजे त्यांनी सन्मानपूर्वक निरोप मागणे आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशीही चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मकता असून त्याचा फटका भाजपाला बसलेला आहे. भाजपाकडून कदाचित देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्याच्याआधी आपण स्वतःहूनच बाहेर पडावे, असा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून होत आहे”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
विनोद तावडे यांचे नाव समोर येणार
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस हे या विधानसभेलाच काय तर पुढच्या कोणत्याही निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होऊ शकतात, भाजपा त्यांना यापुढे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढेही आणणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट करायचे असेल तर भाजपाकडून एकवेळ विनोद तावडे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा कधीच समोर येईल.”
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत हार-जीत होत असते. त्याने खचून जाता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता काही लोक मोदी हटाव, मोदी हटाव असे म्हणत असले तरी जनतेने एनडीएच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.