मनसेचे नेते राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सामील होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. या बैठकीतील तपशील अद्याप दोन्ही पक्षांनी जाहीर केला नसला तरी इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की, राज ठाकरे – अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या २-४ दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल. मात्र मनसेच्या या भूमिकेवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
“निवडणूक आली की, मनसेची कुणाबरोबर तरी सेंटिग चालत असते. स्वतःच्या पक्षाचा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखाकडे आहे, असे कधीही दिसलं नाही. केवळ उद्धव ठाकरेंच्या द्वेषापोटी आणि त्यांना टक्कर देण्यासाठी कुठल्या तरी पक्षाशी हातमिळवणी करायची, हाच धंदा आतापर्यंत मनसेनी केला आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होत असली तरी लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत. त्यांचं या निवडणुकीत पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले, बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले, “जी मागणी केली…”
“मनसेने भाजपाबरोबर युती केली असली तरी आम्हाला काहीही दुःख वाटत नाही. पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र निश्चितच वाईट वाटतं. पक्षप्रमुख चुकीचं करत असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपा पक्षाचाही आता स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. त्यांचा मा. नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवरचा विश्वास उडालेला असल्यामुळेच इकडच्या तिकडच्यांना गोळा करुन आपली पोळी भाजपण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असेही विनायक राऊत म्हणाले.
नारायण राणेंच्या पराभवाची हॅटट्रिक होणार
माझ्या मतदारसंघात खुद्द पंतप्रधान येऊन प्रचार सभा घेणार आहेत, याचा मला आनंद वाटतो. एवढं करूनही भाजपाच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे. नारायण राणेंना जर याठिकाणाहून उभे केले तर त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक होईल, असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.
“ठिगळ्या-ठिगळ्यांची गोधडी म्हणजे…”, राज ठाकरे – अमित शाह भेटीवरून सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका
जागावाटपाबाबत बोलत असताना विनायक राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये सुसंवाद आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातील बहुसंख्या जागांवर एकमत झाले आहे. लवकरच उर्वरित जागांवर समन्वयातून मार्ग निघेल आणि प्रचारालादेखील सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीत मविआ आघाडीला चांगलं यश मिळेल, अशी भूमिकाही विनायक राऊत यांनी व्यक्त केली. तसेच मविआ आघाडीत प्रकाश आंबेडकर यावेत, अशी तीनही पक्षांची अपेक्षा आहे. यासाठी आंबेडकर यांचा सन्मान होईल, अशा जागा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.