वेदात्न समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांची फैरी झाडल्या होती. तसेच, रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प हातातून गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना पाठवले पत्र, म्हणाले…
काय म्हणाले उदय सामंत?
“वेदान्त प्रकल्प राज्यात येण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात सुरूवात झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडे सात महिन्यांचा वेळ होता. वेदान्त कंपनीला किती पॅकेज द्यायचे याचा निर्णय सरकारला घ्यायचा होता. हा निर्णय हायपॉवर समितीने घ्यायचा असतो. मात्र, ही हायपॉवर कमिटी १५ जुलैरोजी तयार झाली. यावेळी या समितीने ३८ हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सात महिने ही समिती का तयार झाली नाही, यांच उत्तर आधी मिळालं पाहिजे. स्वत:च कर्माचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची प्रवृत्ती फार चुकीची आहे”, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.
“दरम्यान, राज्यात होणारा बल्क ड्रग पार्कही महाराष्ट्राबाहेर गेला आहे, हे उद्योगमंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यालाही उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. ”करोना काळात केंद्र सरकारने औषधाची कमतरता राज्यात कमी पडू नये, यासाठी, बल्क पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. १४ ऑक्टोबर २०२० साली प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला. या संदर्भातली बैठक मी तीन दिवसांपूर्वी घेतली. हा प्रकल्प केंद्र सरकारने मंजूर करो अथवा न करो, आम्ही महाराष्ट्र शासन आणि एमआयडीसी मिळून बल्क ड्रग पार्क प्रकल्प उभारणार आहोत”, असेही ते म्हणाले.