Uday Samant on Raj & Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कधीतरी एकत्र येतील, अशी अशा त्यांच्या अनेक हितचिंतकांच्या मनात आहे. दोन्ही पक्षांमधील नेते, कार्यकर्ते अधून मधून या चर्चेला हवा देत असतात. मात्र, अलीकडेच मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा शिकण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे व शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेचे शिवसेना (ठाकरे) व मनसेमधील युतीचे संकेत दिले आहेत.

मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवू अशा आशयाच्या प्रतिक्रिया राज व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी दिल्या आहेत. दोघांनीही अधिकृतपणे या युतीच्या चर्चेवर भाष्य केलेलं नसलं तर हे दोघेही सकारात्मक असल्याच्या प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नुकतीच दिली आहे. तसेच मनसेच्या नेत्यांनी देखील म्हटलं आहे की केवळ राजकारणासाठी एकत्र आलं पाहिजे असं काही नाही. मराठीसाठी एकत्र येता येऊ शकतं. मात्र, राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चाहूल लागल्यापासून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याचं पाहायल मिळत आहे. कारण सत्ताधाऱ्यानी यावर टिका केली आहे.

दरम्यान, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी राज ठाकरेंसमोर अटी ठेवल्याचं वक्तव्य सामंत यांनी केलं आहे. तसेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या किंवा शिवसेनेच्या (ठाकरे) अटी मान्य करणार नाहीत) असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

उदय सामंत म्हणाले, “राज ठाकरे व शिवसेना उबाठा पक्ष प्रमुखांबाबत मी आधीच बोललो आहे. जसं शाळेतील विद्यार्थी मधल्या सुट्टीत डबा खाताना एकमेकांसमोर अटी ठेवतात तशाच अटी इथे देखील आहेत. तू माझ्याशी बोलायचं नाही, तू त्याच्याशी बोलू नको, तू आमक्याशी बोलला नाहीस तर तुला माझ्या डब्यातली चपाती देतो, मी माझ्या घरून आणलंय ते देतो. अशा अटी ठेवल्या आहेत, ज्या राज ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही. राज ठाकरे यांचा स्वतःचं स्वतंत्र विचार आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना झुकवून युतीचा प्रस्ताव ठेवला जातो. मात्र त्या अटींसमोर झुकून राज ठाकरे अशा अटी मान्य करतील असं मला वाटत नाही. राज ठाकरे झुकतील असं मला वाटत नाही.”