अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नोटाला मिळालेली मतं भाजपाची असल्याचा आरोप केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर नोटाला मतं हे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. याबाबत मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (६ नोव्हेंबर) रत्नागिरीत टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सर्वांना समाधान आहे की आमचे सहकारी रमेश लटके जे आज आमच्यात नाहीत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके फार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच समाधान आहे. त्या निवडून आल्यावर आम्ही सगळेच अभिनंदन करू. मी आत्ताच अभिनंदन करून ठेवतो.”
“मतदान कमी का झालं याचं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे”
ऋतुजा लटकेंनंतर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मतं मिळालीत. याविषयी विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “मला वाटतं प्रत्येक पक्षाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. निवडणुकीचं मतदान कमी का झालं याचं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नोटाला मतं का पडली याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे.”
“भाजपामुळे नोटाला मतं हे योग्य नाही”
“काही लोकं नोटाला मतं मिळाली याला भाजपाला जबाबदार धरत आहेत, हे योग्य आहे असं मला वाटत नाही. प्रचारात लोक नोटाला मतदान करणार आहेत असं जाणवलं असेल, त्यामुळे हे खापर भाजपावर फोडण्याचा प्रयत्न झाला असावा. सगळ्यांनीच नोटाला इतकं मतदान का झालं याचं आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे,” असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
“षडयंत्र करायचं असतं, तर वेगळे निकाल दिसले असते”
अंबादास दानवेंनी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. याबाबत विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “असं षडयंत्र करायचं असतं, तर वेगळे निकाल दिसले असते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी जो शब्द दिला होता तो शब्द सर्व कार्यकर्त्यांनी पाळला आहे.”
हेही वाचा : अंधेरी निवडणुकीत ऋतुजा लटकेंचा विजय, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पैसे देऊन…”
“नोटाला इतकी मतं पडली याचं खापर फोडण्यापेक्षा सर्वांनीच त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे,” असंही सामंत यांनी म्हटलं.