रत्नागिरी : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरं जावं लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा झाला, मात्र, विधान परिषदेत या निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. तसेच राज्यसभा निवडणुकीत गणितं कोणी जुळवली हे अख्ख्या देशाने बघितलं, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. ते रत्नागिरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदय सामंत म्हणाले, “राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली हे अख्ख्या देशाने बघितलं आहे. विधानपरिषदेची निवडणूक २० जूनला होते आहे.”

“उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सचिन अहीर आणि पाडवी यांना उमेदवारी दिलीय. आमचे दोन्ही सदस्य विधान परिषदेत जातील. महाविकासआघाडीकडून राज्यसभा निवडणुकीत जो निष्काळजीपणा झाला त्याची पुनरावृत्ती होणार नाही. आमचे उमेदवार निवडून येतील,” असंही उदय सामंत यांनी नमूद केलं.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा दौऱ्यावरून टीका करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांनाही उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी नितेश राणेंचं नाव न घेता टोला लगावला. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे घाबरणार नाही, उलट ते दौरा यशस्वी करून परत येतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : विद्यापीठाच्या निर्णयात हस्तक्षेप केला असेल तर राजीनामा देतो- उदय सामंत

“धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बहुसंख्य लोकं रिफायनरी पाहिजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल तर मुख्यमंत्री या प्रकल्पाचा विचार करतील,” असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना लिहिलेलं पत्र योग्य की अयोग्य यावर भाष्य करणं टाळलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant comment on mva and rajya sabha election amid upcoming mlc election pbs