रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण होण्यास आनखी दोन वर्ष जातील असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापुर्वीच जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पुर्ण होणार याकडे कोकण वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम २०१२ पासूनच सुरू आहे. ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा महामार्ग रखडला असून त्याला एकच सरकार जबाबदार नाही. असे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग हा ‘बीओटी’ तत्त्वावर बांधला जाणार होता. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर या महामार्गासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा मार्ग रखडला. केंद्र व राज्य शासनातील मंत्र्यांनीही या मार्गाबाबत अनेकदा खंत व्यक्त केली असताना आपल्यालाही हा महामार्ग लवकर व्हावा, असे वाटत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी चिपळूणमध्ये महामार्ग व कामाबाबत शंका व्यक्त केली होती. याबाबत त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवली गेली असावी, अशी सामंत यांनी शंका व्यक्त केली. काहीही झाले तरी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे. यात शंका नाही. महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांचे ‘बाँडिग’ चांगले असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा…स्वतःच्या दोन लहान मुलांचा खून करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा कर्जत

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही आमदार हे महायुतीचे विजयी होणार आहेत, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. विधानसभेत पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असून विधानसभेला शिवसेनेचा स्ट्राईक रेट राज्यात सर्वांत जास्त आहे आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व महायुतीने स्वीकारले असून शिंदे यांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूका लढल्या जाणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले. महायुतीतील दोन जबाबदार मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गावर वेगवेगळी विधाने केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र कोकण वासियांच्या द्रुष्टीने हा महामार्ग लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.