स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ असे संबोधण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) चे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्याविरोधा तक्रारही दाखल केली.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि कॅबिटेट मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामराल आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, पण बोलताना आपण काय बोलतो याचा विचार करायला हवा. जर त्याला एकनाथ शिंदेंबद्दल काही बोलायचे असेल तर त्याने मुंबई, रत्नागिरी किंवा कोल्हापूरला यावे. तो पाँडिचेरीमध्ये का लपला आहे?”

…तर त्याने मुंबई, रत्नागिरी किंवा कोल्हापूरला यावे

कुणाल कामरा प्रकरणावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “कुणाल कामराने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर अपमानास्पद टिप्पण्ण्या केल्या आहेत. हे कोणत्याही राज्यासाठी किंवा देशासाठी चांगले नाही. त्याला वाटते की तो खूप ज्ञानी आहे, पण ते तसे नाही. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे पण बोलताना आपण काय बोलतो याचा विचार करावा… जर त्याला एकनाथ शिंदेंबद्दल काही बोलायचे असेल तर त्याने मुंबई, रत्नागिरी किंवा कोल्हापूरला यावे. तो पाँडिचेरीमध्ये का लपला आहे?”

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणारे गाणे सादर केले. या गाण्यात शिंदे यांच्या राजकीय भूमिकांवर व्यंग्य केले होते. यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांनी खारमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली होती.

माफी मागण्यास कुणाल कामराचा नकार

या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीसाठी समन्स बजावले, पण तो चौकशीसाठी अद्याप उपस्थित झाला नाही. कामराने माफी मागण्यास नकार देत, पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, कुणाल कामराचे विनोद अप्रिय असल्याचे मान्य केले, पण हिंसाचाराची निंदा केली. त्यांनी यावेळी विनोद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादाही लक्षात घ्यावात असे त्यांनी म्हटले.