रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. हा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना आज (२६ एप्रिल) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर सामंत यांनी ही भेट नाट्य परीषदेसंदर्भात घेतली होती. परंतु या बैठकीवेळी दोघांमध्ये बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी आणि त्याला सुरू असलेल्या विरोधाबाबत चर्चा झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर सामंत यांनी माध्यमांशी बातचित केली. सामंत म्हणाले की, ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे काल काय परिस्थिती निर्माण झाली होती त्याची माहिती मी शरद पवारांना दिली.

सामंत यांनी सांगितलं की, काल येथे आंदोलक महिलांना अटक केली होती. परंतु त्यांना आता सोडून दिलं आहे. प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलायला तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तिथल्या ३०० ते ३५० लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील हालचाली केल्या जातील.

हे ही वाचा >> …तर काँग्रेसचा प्लान तयार! काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

उदय सामंत म्हणाले की, मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की, जसे या रिफायनरीला विरोध करणारे विरोधक आहेत तसेच समर्थकही आहेत. तसेच तिथे सर्वेक्षण नव्हे तर केवळ मातीचं परिक्षण सुरू होणार आहे. त्यानंतर तिथे प्रकल्प आणायचा की नाही हे कंपनी ठरवेल. शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करावं. शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यास शासन कटीबद्ध आहे. याबाबत आज शरद पवारांशी चर्चा झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant meets sharad pawar on barsu refinery protest asc