राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे शिंदे गट व भाजपा युतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार प्रलंबित असतानाच अजित पवार गटाचा सरकारमध्ये प्रवेश झाला. पहिल्याच दिवशी अजित पवार गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील व भाजपातील इच्छुक मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यात नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. सरकारमध्ये सहभागी असणारे बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.
उदय सामंत सध्या विदर्भात असून त्यांना माध्यम प्रतिनिधींनी मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप व बच्चू कडूंच्या नाराजीबाबत प्रश्न विचारले. यावेळी उदय सामंत यांनी सरकारमधील सहभागी अनेकांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचं विधान केलं.
“एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील”
“बच्चू कडूंनी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे. बच्चू कडू माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या सरकारबरोबर त्यांचं प्रहार युतीत आहे. त्यांच्याबरोबर आमचे अपक्ष राजेंद्र यड्रावकर मंत्री होते, त्यांनाही न्याय मिळालेला नाही. अन्यही अनेकांना न्याय मिळालेला नाही. आमच्या ४० आमदारांपैकीही इच्छुकांना न्याय मिळालेला नाही. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील”, असं उदय सामंत म्हणाले.
“आमचेच मुख्यमंत्री, कोणतीही वाईट वागणूक नाही”
दरम्यान, सरकारमध्ये शिंदे गटाला वाईट वागणूक मिळते का? असा प्रश्न विचारताच उदय सामंत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. “कोणतीही वाईट वागणूक आम्हाला मिळत नाही. इथे मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत. आमच्या सर्वांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे”, असं उदय सामंत म्हणाले.
“अर्थखातं कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही कुणाला कोणतं खातं द्यावं, याची चर्चाही करत नाही”, असं उदय सामंत यांनी नमूद केलं.