Uday Samant On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअॅप स्टेट्स सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचं पाहायला मिळालं. त्यांचं हे स्टेट्स चांगलंच व्हायरलं झालं. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले. मात्र, आता यावर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी आज (२३ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान करत रवींद्र धंगेकर यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं सांगितलं. “मी कालच रवींद्र धंगेकर यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं आहे”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
“रवींद्र धंगेकर यांनी काल गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेला फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवला होतं असं मी पाहिलं. त्याबाबत मी काल बोललो की त्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल. तसेच मी कालच रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिलं आहे. कारण त्यांच्या सारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीने काम करायचं असेल आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही. असं मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे”, असं उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
उदय सामंत शनिवारी काय म्हणाले होते?
रवींद्र धंगेकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सबाबत बोलताना मंत्री उदय सामंत शनिवारी (२२ फेब्रुवारी) म्हणाले होते की, “मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यात जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वांना आनंद होईल.” दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या स्टेट्सबाबत उदय सामंत यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रवींद्र धंगेकरांचं स्टेट्स काय होतं?
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सला गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला होता. तसेच त्या फोटोवर स्टेट्सला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवलं होतं. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या स्टेट्सची मोठी चर्चा रंगली. तसेच रवींद्र धंगेकर हे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या.
धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतली होती
रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असं रवींद्र धंगेकर तेव्हा म्हणाले होते.