Uday Samant On Thackeray Group : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे, असं विधान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांच्या या विधानावर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केलं आहे. ‘ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे’, असं विधान सामंत यांनी केलं आहे.

‘पुढच्या आठ दिवसांत मोठा पक्षप्रवेश होईल’

उदय सामंत यांनी म्हटलं की, “१८ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर आहेत. मी १९ तारखेला दावोस दौऱ्यावर जाणार आहे. २४ तारखेला दावोसवरून पुन्हा येणार आहे. त्यामुळे २४ तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला असा शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे”, असं भाष्य उदय सामंत यांनी केलं.

सामंत पुढं असंही म्हणाले, “मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ज्या प्रकारे बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटतं की आम्हीच बरोबर होतो. त्यामुळे आता ठाकरे गटाचे लोक आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचं सांगायचं झालं तर ठाकरे गटाची काँग्रेस जशी झाली आहे, तशी संघटनात्मक काँग्रेस रत्नागिरीत झालेली दिसेल”, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

‘भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन मिळालं तर…’

उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भास्कर जाधव यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “भास्कर जाधव असं म्हणाले होते की, शिवसेना ठाकरे गटाची काँग्रेस झाली. त्यांच्या या विधानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी असं म्हटलं की, शिवसेना ठाकरे गटाची ३ वर्षांपूर्वीच काँग्रेस झाली. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जपत आहोत. पण भास्कर जाधव यांची सध्या कुंचबणा होत असेल. आशीच कुंचबणा आमची तीन वर्षांपूर्वी झाली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता. त्या अनुषंगाने मी असं म्हटलं की जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर आमच्यासाठी फायद्याचं असेल”, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant on next eight days a big leader will enter the party from the shiv sena thackeray group to the shiv sena shinde group gkt