Maharashtra Cabinet Portfolio Distribution Latest Update : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. दरम्यान महायुतीच्या सरकारमधील खातवाटप कधी होणार? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक आणि मंत्रिमंडळाचे खातेवाटप याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक देखील उद्या होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल बोलताना सामंत यांनी सांगितलं की, “विधान परिषदेचा सभापती कोण असावा? तो भाजपाचा असावा, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा असावा की राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असावा हे ठरवण्याचे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील”.
मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या मुद्द्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, “मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की दोन ते तीन दिवसात खातेवाटप होईल दुसरा दिवस आज रात्री बारा वाजता संपणार आहे आणि तिसरा दिवस उद्या १२ वाजता संपणार आहे. त्यामुळे सांगितलेल्या आश्वासनाला उद्या १२ वाजेपर्यंतची मुदत आहे. उद्या १२ वाजण्याआगोदर खातेवाटप होईल याची खात्री बाळगा”.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला मोठं बहुमत मिळालं. महाराष्ट्रात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. मात्र मोठं बहुमत मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले. पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्तास्थापन केली. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, राज्यातील जनतेला महायुती सरकारच्या विस्ताराची प्रतीक्षा होती. अखेर सत्तास्थापनेनंतर १० दिवसांनी आज (१५ डिसेंबर) नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही वाचा>> “छगन भुजबळांसाठी पुढे मोठा विचार होणार असेल म्हणून…”, अजित पवार गटाच्या नेत्यांचं सूच…
महायुतीच्या ३९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. यापूर्वी देखील राज्यात महायुतीचं सरकार होतं. मात्र, या नव्या सरकारमध्ये काही नवीन चेहरे पाहायला मिळत आहे. नव्या सरकारमध्ये भाजपाने नऊ, शिवसेनेने (शिंदे) सहा व राष्ट्रवादीने (अजित पवार) पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.