Uday Samant On Shivsena Thackeray Group: विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. असं असतानाच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे. “शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील”, असा मोठा दावा उदय सामंत यांनी आज (२३ जानेवारी) माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच याचा पहिला टप्पा उद्या पार पडणार असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
“मी आज पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिनवेळा दवोसला जाण्याची संधी दिली. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एवढी मोठी गुंतवणूक येत आहे. मात्र, मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, काही नेते बालिश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता न बोलले बरं, मी त्यांच्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता त्यांचा राजकीय ‘उदय’ करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा माझा मोठेपणा आहे. पण अशा कोणत्याही बालिश विधानामुळे माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण होणार नाही”, असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
‘उद्या पहिला ट्रेलर पाहायला मिळेल…’
उदय सामंत पुढे म्हणाले, “मी आधीही सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या (२४ जानेवारी) तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, काँग्रेसचे ५ आमदार आणि ठाकरे गटाचे १० माजी आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार आहे”, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
“रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मी कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. त्यानंतर सातारा आणि सातारऱ्यानंतर पुणे असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे. आता तुम्हाला उद्यापासून ठाकरे गटातून दररोज एकजण फुटल्याची बातमी पाहायला मिळेल”, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.