रत्नागिरीतील बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. सोमवारी रात्रीपासून स्थानिक नागरिकांनी रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रात्रीपासून हे आंदोलनकर्ते तिथेच बसून होते. आज प्रकल्पस्थळाचं सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती समजत आहे. याला विरोध करण्यासाठी बारसू येथे अनेक आंदोलनकर्ते जमले आहेत. आज सकाळी पोलिसांनी त्यातल्या काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे.
तसेच बारसू येथील या प्रकल्पाला आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून विरोध केला जात आहे. यामध्ये ठाकरे गटातील काही नेत्यांचा समावेश आहे. रिफायनरीला होणारा वाढता विरोध पाहता शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनीच रिफायनरीसाठी बारसू येथील जागा सुचवली होती, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
उदय सामंतांनी पुरावा म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक जुनं पत्र प्रसारमाध्यमांसमोर सादर केलं आहे. हे पत्र १२ जानेवारी २०२२ रोजीचं असून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलं होतं. बारसू येथील जागा रिफायनरीसाठी कशी योग्य आहे, याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे दिलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला.
हेही वाचा- “राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासाची, पण…”, अजित पवारांनी बारसू रिफायनरीबाबत स्पष्ट केली भूमिका
पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हे पत्र आहे. या पत्रात त्यांनी काय म्हटलंय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पत्रात उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की, बारसूमधील १३०० एकर आणि नाटेमधील २१४४ एकर जमीन आम्ही रिफायनरीसाठी देऊ शकतो. या जमिनीपैकी ९० टक्के जमिनीवर वसाहती नाहीत. झाडी नाही किंवा वाडी नाही. त्यामुळे कोणतंही घर किंवा वाडी विस्थापित करण्याची गरज नाही. या पत्रात उद्धव ठाकरे स्वत:चं म्हणालेत की हा प्रकल्प आल्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. राज्याची आर्थिक व्यवस्था मजबूत होईल.महाराष्ट्राचा जीडीपी ८.५ टक्क्यांनी वाढणार आहे, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे, त्यामुळे हा प्रकल्प बारसू येथे उभारावा, असं पत्र उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधानांना लिहिलं.”