सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेला राज्याची उद्योमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – ‘टाटा एयरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सुभाष देसाईंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले ”राज्यातील सरकार…”
काय म्हणाले उदय सामंत?
“एयरबर प्रकल्पावरून जो गाजावाजा करण्यात येत आहे. मला आर्श्चय वाटते आहे की, एका ट्वीटवरून जयंत पाटील असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. हे आमचं दुर्भाग्य आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं मी बोललो होतो. यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केले. मात्र, पुढे अशी माहिती आली की २१ सप्टेंबर २०२० ला या प्रकल्पाचा एमओयू झाला होता. त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करू नये. विरोधात असताना बैठका सकारात्मक झाल्या असं म्हणणं खूप सोप्पी असतं”, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा – ‘कटुता संपवाच’, ठाकरे गटाकडून फडणवीसांना आवाहन; म्हणाले “विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा…”
“महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधी पक्षनेते असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, तर केवळ गप्पा मारून, त्यांच्यात संभ्रम निर्माण करून किंवा ट्वीट करून उपयोग नाही. सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करायचे, हा पळपुटेपणा योग्य नाही”, असेही ते म्हणाले.