Uday Samant : ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास मी सक्षम आहे असं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. आता माजी मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी शरद पवारांनी काँग्रेसचा अपमान केला आहे असं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यावर तुमचं मत काय? असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की, “आहेच. असं आहे की, ममता बॅनर्जी या देशाच्या एक प्रभावी नेत्या आहेत. त्यांच्याकडे ती (इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची) क्षमता आहे. आज देशाच्या संसदेत त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तबगार, कष्टाळू आणि जागरूक आहेत. त्यामुळे त्यांना (ममता बॅनर्जी) तसं म्हणण्याचा अधिकार आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
हे पण वाचा- Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
“महायुतीचं सरकार आल्यापासून म्हणजेच २०२२ पासून आम्ही सीमा भागातल्या लोकांना मदत करतो आहोत. तिथे अनुदान पोहचवत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नळ पाणी योजना पोहचवली होती. काही लोक फक्त पत्र लिहितात. मी उद्योग मंत्री असताना युवकांचा बेरोजगारांचा मेळावा घेतला तो सीमा भागात होता. जे तिथे गेलेले नाहीत त्यांना सीमा भागातील बांधवांच्या वेदना कळणार नाहीत. काँग्रेसचं सरकार मराठी बांधवांवर अन्याय करतं आहे. त्या मराठी बांधवांबरोबर राज्याचं सरकार उभं आहे.” असं उदय सामंत ( Uday Samant ) म्हणाले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली.
शरद पवारांनी काँग्रेसचा अपमान केला-उदय सामंत
दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची सूत्रं देण्याचं सूतोवाच हे शरद पवार यांनी केलं होतं. ममता बॅनर्जींकडे नेतृत्व गेलं पाहिजे हे शरद पवारांनी म्हणणं हा काँग्रेसचा अपमान आहे. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात राज्यांमधल्या निवडणुका जिंकणंही काँग्रेसला कठीण झालं आहे. देशातल्या निवडणुकांमध्येही ते अपयशी ठरले आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा अपमान आहे. राहुल गांधींऐवजी इंडिया आघाडीचं नेतृ्त्व हे जर ममता बॅनर्जी करणार असतील तर राहुल गांधी ते नेतृ्त्व सांभाळायचा कमकुवत आहेत असं महाविकास आघाडी दाखवते आहे असं उदय सामंत ( Uday Samant ) यांनी म्हटलं आहे.