जळगावातील पाचोऱ्यात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळात ४०० कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपाला शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री उदय सामंत हे गुलाबरावांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.
उदय सामंत म्हणाले की, ४०० कोटी काय, ४० कोटी काय अगदी ४० पैशांचाही भ्रष्टाचार गुलाबरावांनी केला नाही, याची खात्री मी देतो. त्यांचा सहकारी म्हणून मला खात्री आहे की, त्यांना कोणताही घोटाळा केला नाही.
उदय सामंत म्हणाले की, गुलाबराव पाटलांसारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक जो पूर्वी पानटपरी चालवायचा तो बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मोठा झाला. जळगावात जी शिवसेना वाढवण्याचं काम झालं, त्यात या माणसाचा वाटा मोठा आहे. अशा वेळी त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचे पंख छाटण्याचं काम झालं. म्हणून ते एकनाथ शिंदेंसोबत आले.
हे ही वाचा >> “आम्ही दगड मारून सभा, आंदोलने…”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा विनायक राऊतांकडून समाचार, म्हणाले…
मंत्री सामंत म्हणाले की, गुलाबराव पाटील हे उत्कृष्ट भाषण करतात म्हणून त्यांना हे लोक (ठाकरे गट) भाषण करू द्यायचे नाहीत. ही त्यांची रणनीती होती. गुलाबरावांसोबत असं वागणं फार चुकीचं होतं.