मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे (राम मंदिर, अयोध्या) मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल, असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (१३ नोव्हेंबर) दिलं होतं. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरती ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्यावारी घडवावी.”
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. परंतु, आठ दिवसांपूर्वी त्यांच्या इंडिया आघाडीतले सदस्य असलेल्या नितीश कुमार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत. बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने महिलांवर अश्लील शेरेबाजी केली, अश्लील वक्तव्य केलं त्याबाबतीत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे. परंतु, उद्धव ठाकरे त्याबाबत काहीच बोलले नाहीत.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आम्हाला अपेक्षित होतं की, नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यावर इंडिया आघाडीतले लोक बोलतील, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत यावर बोलतील. परंतु, तसं काही झालं नाही. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल. परंतु, नितीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर इंडिया आघाडीतल्या प्रत्येक पक्षाचं काय मत आहे? ते त्यांनी सांगावं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलत असताना मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी त्यांनी एक विचित्र वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या महिला आमदार खाजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. नितीश कुमार यांच्या विचित्र वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नितीश कुमार म्हणाले, “पुरुष रोज रात्री पत्नीशी संबंध निर्माण करतात. यामुळे मूल जन्माला येते. परंतु, मुली साक्षर असतील तर प्रजनन दर घसरतो. मुलगी सुशिक्षित असेल तर प्रजनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत खाली येतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले असेल तर प्रजनन दर राष्ट्रीय स्तरावर १.७ टक्क्यांपर्यंत खाली येतो. नितीश कुमार पुढे लैंगिक शिक्षणावरही बोलले. लैंगिक शिक्षणावर बोलताना त्यांनी प्रजनन दर कसा कमी होतो यावरही भाष्य केलं. परंतु, ते वक्तव्य किळसवाणं होतं, असा आरोप विरोधक करत आहेत.