Uday Samant : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी यासंदर्भातला शासन आदेश जारी केला आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. माननीय शेखावत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे त्याची अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपुर्द केली आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेखावत यांचे आभार मानतो. येत्या आठ ते पंधरा दिवसात जे काही प्रस्ताव सादर करायचे असतात ते सादर करु. प्राकृत भाषेला जो मराठी भाषेला दर्जा मिळाला आहे. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास केला जातो आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठीचं आश्वासन शेखावत यांनी दिलं असं उदय सामंत यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेखावत यांचे मी मनापासून आभार मानतो-सामंत
३१ जानेवारी आणि १ तसंच २ फेब्रुवारी या दिवशी पुण्यात मराठी विश्वसंमेलानाच्या उद्घाटनाला शेखावत हे येणार आहेत. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या वतीने मी शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या साहित्यिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचेही मी धन्यवाद देतो.
मराठी भाषेतलं काम हे आम्ही साहित्यिकांना विश्वासात घेऊन केलं जाईल-सामंत
मराठी भाषेतलं काम हे आम्ही साहित्यिकांना विश्वासात घेऊन केलं जाईल असंही उदय सामंत म्हणाले. साहित्य संमेलनाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे यावर्षीही तो निधी देण्यात येईल. दिल्ली आणि अन्य भागात मराठी शाळाही आहेत. त्या शाळाही सुदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
सदानंद मोरे यांनी काय म्हटलं आहे?
मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी कार्य करतो आहे. गर्जा महाराष्ट्र ही लेखमालाही लिहिली. या भाषेला दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. महाराष्ट्र प्राकृतचा प्रभाव संस्कृत साहित्यावर पडला आहे. महाराष्ट्र प्राकृत आणि मराठी भाषा यासाठी कार्य करणं आता शक्य होणार आहे. मराठी भाषेची जी आधीची आवृत्ती आहे ज्याला प्राकृत असं म्हणतात तिलाही आभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही समाधानाची बाब आहे असं सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे.