ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (१६ एप्रिल) यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. नवी मुंबईतल्या खारघर येथील सेंट्रल पार्क येथे दुपारी हा कार्यक्र पार पडला. रणरणत्या उन्हात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ‘श्री सदस्य’ हा सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने जमले होते. परंतु या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. तसेच या कार्यक्रमात सरकारने कोणताही हलगर्जीपणा दाखवला नसल्याचं नमूद केलं.
मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, या कार्यक्रमासाठी संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली होती. लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी बस सेवा पुरवण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी डॉक्टर, नर्स, मदतनीस आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु दोन दिवसात वातावरण बदलल्यामुळे तापमान वाढलं. काही लोक आदल्या दिवशी रात्रीच तिथे आले होते. त्यांना थांबवणं योग्य नव्हतं. प्राथमिक उपचारांना लागणारी सर्व यंत्रण सज्ज होती. उष्माघातामुळे आतापर्यंत १३ जण दगावले आहेत. तर २० जण अजूनही उपचार घेत आहेत. २६ जणांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हे ही वाचा >> “महायुतीत अजित पवार…”, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, म्हणाले, “भाजपा आणि आमचं टार्गेट सेट”
उदय सामंत म्हणाले की, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशासनाने कुठेही हुकूमशाही करून किंवा एकाधिकारशाही वापरून हा कार्यक्रम केला नव्हता. श्री सदस्यांशी चर्चा करूनच आम्ही आयोजन केलं होतं. परंतु त्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणारे राजकारणी आपल्या राज्यात आहेत हे आपलं दुर्दैव आहे. ज्यांच्या कुटुंबांचं नुकसान झालं आहे त्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करण्यात, सरकारची चूक दाखवण्यात काही लोक मग्न आहेत. हा कार्यक्रम सरकारने शुद्ध आणि पारदर्शकपणे आयोजित केला होता.