ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांवर अशा भाषेत टीका केल्यास, तुम्हाला आम्ही सोडणार नाही, असा धमकीवजा इशारा महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. यानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंकडून ‘फडतूस गृहमंत्री’ अशी टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “लाळ घोटत…”
उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती. सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राकडून अशी भाषा वापरली असती, तर समजू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “फडणवीसांनी पुढील ४८ तासांत…”, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं खुलं आव्हान!
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस’ केल्याबद्दल विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “ज्याने तोंडात सोन्याचा चमचा ठेवला आहे, त्यालाच मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे, असं अजिबात नाही. त्यामुळे कोणी कोणत्या भाषेत टीका करायची, यावर काहीतरी नियंत्रण हवं. सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राकडून अशी भाषा वापरली असती, तर आम्ही समजू शकतो.”
हेही वाचा- “…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकी
“पण उद्धव ठाकरेही अशी भाषा करायला लागले, तर ते लोकशाहीला धरुन नाही, असं मला वाटतं. गृहमंत्री ‘फडतूस’ आहेत, असं बोलणं योग्य आहे का? हे आपण ठरवलं पाहिजे. मी सगळ्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर असं बोलणं योग्य नाही. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे, त्या राजकीय संस्कृतीत वावरताना आपण संयमाने आणि तोलून मापून बोललं पाहिजे,” असंही उदय सामंत म्हणाले.