वाई: सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून खासदार उदयनराजे आक्रमक झाले.त्यांनी आज मंगळवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेत शहरातील जातीय सलोखा बिघडविणाऱ्या अपप्रवृत्तींना ठेचलेच पाहिजे.याप्रकरणात जो युवक ताब्यात आहे त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याकडे केली.सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून वातावरण तणावपूर्ण आहे.यावरून कारवाईची मागणी करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना धमकीचे फोन आले.यावरून आक्रमक होतखासदार उदयनराजे भोसले यांनी आज मंगळवारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, गितांजली कदम, ॲड.वर्षा देशपांडे, विजय मांडके, विजय बडेकर, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, महापुरुषांची बदनामी करणाऱ्याला अल्पवयीन तरी कसे म्हणायचे. असा मजकुर प्रसारित झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार करण्यात आली. त्यापुर्वी दोन दिवस हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला. असा प्रयत्न होणेच दुर्देवी आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्यांना नंतर धमकीचे मेसेज आले.एकंदरच हा प्रकार गंभीर असून त्याची दखल आपण गंभीरतेने घ्यावी. ज्यांना धमकी आली आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे. उगाच इतर कोणालाही तसेच विलासपूर येथे बंदोबस्त ठेवू नका, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. महापुरुषांची बदनामी करण्याचे धाडस होतेच कसे, हा प्रश्न मनाला वेदना देणारा आहे. अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत.
या प्रवृत्तींमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत आहे. सातारा शांतताप्रिय असून कोणत्याही अप्रिय घटना यापुर्वी घडलेल्या नाहीत. एकदा का जर ठिणगी पडली. रान पेटले तर मग त्याला कोणीही अडवू शकणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या आणि उपलब्ध पोलिस यंत्रणेचा विचार करता त्यांनाही ते शक्य होणार नाही. हे टाळायचे असेल तर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.कोणीही असो. कोणत्याही जातीधर्माचा असो. त्याला धडा शिकवलाच पाहिजे. असे झाले तरच इतरांना पायबंद बसेल.छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समभावाची शिकवण आम्ही जपत असून आम्ही सातारा शहरातील जातीय सलोखा बिघडून देणार नाही. पण त्यासाठी पोलिसांनी देखील अशांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे खासदार उदयनराजे यांनी म्हंटले आहे.