गणेशोत्सव काळात दरवर्षी आवाजाची पातळी, ध्वनी प्रदूषण हे मुद्दे कायम चर्चेत असतात. यंदा जवळपास दोन वर्षांनी निर्बंधमुक्त पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या काही भागात स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारे मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यावरून प्रशासनावर टीकास्र सोडलं आहे. याआधी देखील त्यांनी या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता. आता साताऱ्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनाला सल्ला दिला आहे.
गेल्या महिन्यात यासंदर्भात बोलताना उदयनराजे भोसलेंनी हा व्यवसाय करणाऱ्यांच्या कुटुंबाचा मुद्दा उपस्थित केला होता. “या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याने ध्वनिक्षेपकांवर बंदी आल्यास त्यांना आर्थिक नुकसान होणार आहे. साताऱ्यातच यावर बंदी आणि इतरत्र ते जोरजोरात वाजणार, असा दुजाभाव का? साताऱ्यातच आडकाठी कशासाठी? याचे सविस्तर निवेदन प्रशासनाने काढावे. संबंधित अधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपकांचा व्यवसाय करणाऱ्यांचाही विचार करुन निर्णय घ्यायला नको का? या व्यावसायिकांच्या भांडवलाचे काय? ध्वनिक्षेपक वाजल्याने आभाळ कोळसणार आहे का?” असा सवाल उदनराजे भोसलेंनी केला होता.
गणेशोत्सवात साताऱ्यातच डॉल्बी का वाजवू देवू नये ? ; खासदार उदयनराजेंचा संतप्त सवाल
यासंदर्भात आज बोलताना उदयनराजेंनी प्रशासनाला हे सर्व ध्वनिक्षेपक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. “तुम्हाला ध्वनिक्षेपकांना परवानगी द्यायची नाहीये ना? ज्या लोकांनी ध्वनिक्षेपकांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्यामागे बँकांनी तगादा लावला आहे. जर ते हफ्ते फेडू शकले नाहीत, तर त्यांच्या घरांवर जप्ती येणार. त्यापेक्षा ज्यांचे ध्वनिक्षेपक आहेत, त्यांच्याकडून शासनाने ते विकतच घ्यावेत”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
“तर मी माझ्या गाडीच्या पुढे…!”
दरम्यान, साताऱ्यामधील जनता नियमांचं पालन करते, म्हणून त्यांच्यावर असे नियम लादले जातात का? अशी विचारणा केली असता उदयनराजेंनी आपल्या शैलीत त्यावर उत्तर दिलं. “तसं असतं तर काय राहिलं असतं. मी तर मग दररोज एक ध्वनिक्षेपकांची गाडी माझ्या गाडीच्या पुढे ठेवली असती आणि सगळीकडे फिरलो असतो”, असं ते म्हणाले.