राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नुकताच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादही टोकाला गेला होता. दरम्यान, राज्यातील या राजकीय परिस्थितीबाबत भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – “उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं विधान
काय म्हणाले उदयनराजे?
“राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. एकाने दुसऱ्यावर आरोप केले, तर साहाजिक आहे, समोरचा उत्तर देणार आहे. मात्र, माझी सर्वांना विनंती आहे, वाद टोकाला जाऊ न देता सामंजसपणाने प्रकरण मिटवायला हवं”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
यावेळी राज्यातील शिंदे सरकार अडीच वर्ष टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “जेव्हा लोकं विचाराने एकत्र येतात, तेव्हा ते बऱ्याच वेळ एकत्र राहू शकतात. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असल्याचे कारण नाही. त्यामुळे हे सरकार अडीच वर्ष टिकेल”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘२०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण असेल?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले, “येणाऱ्या निवडणुका आम्ही…”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही त्यांनी भाष्य केलं. “शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीही ते राहिले आहेत. आज देशातल्या अनुभवी नेत्यांपैकी ते एक आहेत. आज प्रकृती ठीक नसतानाही ते शिर्डीतल्या शिबिरात गेले होते. मी एवढंच सांगेन की त्यांना उदंड आयुष्य लाभो”, असे ते म्हणाले.