Udayanraje छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथी आहे. हाच कार्यक्रम आज किल्ले रायगड या स्वराज्याच्या राजधानीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारी वक्तव्यं कुणी केली तर १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसंच इतरही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी केल्या.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

आज आपण अत्यंत थोर व्यक्तीपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण उपस्थित राहिलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव हा विचार दिला. स्वराज्याची स्थापनाही त्यांनी केली. आज लोकशाही आहे, त्या काळात हा विचार छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या रुपाने दिला होता. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवरायांनी रचला असंही उदयनराजे म्हणाले. तसंच त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

उदयनराजे भोसलेंच्या मागण्या काय?

१) छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा. कुठलाही जामीन त्या व्यक्तीला मिळू नये

२) छत्रपती शिवाजी महाराजांचा समग्र इतिहासाचं प्रकाशन सरकारने करावं.

३) सेन्सॉर बोर्डही स्थापन करण्यात यावं. एखादा माणूस कादंबरी लिहितो पण त्याला काही पुरावे नसतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत गैरसमज होतात ते अशा गोष्टींमुळे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड स्थापन केलं पाहिजे.

४) छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक झालं पाहिजे ही देखील शिवभक्तांची मागणी आहे.

५) शहाजी राजेंची जी समाधी आहे, त्यासाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.

६) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी माझी मागणी आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

या प्रमुख मागण्या उदयनराजेंनी त्यांच्या भाषणात केल्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी उदयनराजेंच्या मागण्या योग्यच आहेत आणि त्या मान्य होतील असंही म्हटलं आहे. तसंच महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरंतर टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे हीच आमची भावना आहे. मात्र उदयनराजेंनी केलेल्या मागणी प्रमाणे आम्ही कठोर कायदा करु असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.