करोना पुन्हा बळावत असल्यानं राज्य सरकारकडून संक्रमण रोखण्यासाठी पावलं टाकली जात आहेत. गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू केले असून, यातच वीकेंड लॉकडाउनचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, तरीही गर्दी कमी होत नसल्यानं सरकारकडून बंधने अधिक कठोर करण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे लॉकडाउनला विरोध होताना दिसत आहे. सरकारच्या लॉकडाउनविरोधात आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच एल्गार पुकारला आहे. उदयनराजे यांनी साताऱ्यात भीक मागो आंदोलन करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.
राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोत्यावर बसून भीक मागो आंदोलन केलं. हातात थाळी घेऊन उदयनराजेंनी ‘भीक मागो’ आंदोलन करत टाळेबंदीला तीव्र विरोध दर्शविला.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले,”उन्हाळा इतका वाढला आहे. लोकं बाहेर बसले, तरी पोलीस लाठीमार करतात. त्यांना कुणी अधिकार दिला? मी कालही बोललो की, जो येतो… तो जातो. आकडेवारी बघितली का? काहीही न करता उगाच लॉकडाउन, तुमच्या बापाची इस्टेट आहे का? त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. ज्यांना काही मिळत नाही, त्या लोकांनी काय करायचं? राज्यामध्ये ज्यांच्या मृत्यू झालाय, त्यामध्ये वयोवद्ध, ज्यांना आजार होता अशांचा समावेश आहे. जगाची रीत आहे. जो येतो, तो जातोच. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं. तब्येत चांगली ठेवली. प्रतिकार शक्ती चांगली ठेवली पाहिजे, तुम्हीही कसंही वागता. सरकार लस पुरवू शकत नाही. आणि पैसे खाता. पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणात यांनी किती पैसे खाल्ले मलाही माहिती नाही. लोकांनी विचार केला पाहिजे, माझ्या एकट्याची जबाबदारी आहे का? जर राजेशाही असती, तर हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं. एक मेला तरी चालेल, पण लाख जगले पाहिजे. यांचं मी जगलो पाहिजे, लाख मेले तरी चालतील, अशी परिस्थिती आहे,” अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली.
“लॅाकडाउन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…,” उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा
उदयनराजे यांनी या अगोदर देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. “संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाउन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.