सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्यदिव्य कार्यक्रमास उदयनराजेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता. उदयनराजेंच्या याच अनुपस्थितीवर आता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याच कार्यक्रमात आमंत्रणाची वाट कशाला पाहायची, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> शिवराय-एकनाथ शिंदेंच्या तुलनेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले “इमान विकलेल्या…”
“मला त्या कार्यक्रमाचे पत्र आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून माझ्या बंगल्यावर हे निमंत्रण आले होते. याव्यतिरिक्त मला न्यायला कोणी गाडी वगैरे घेऊन आलं नव्हतं. अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण काढण्यात आले. याच कारणामुळे लोकांच्या मनात वेगळ्या भावना होत्या. आपण ज्या घरातील वारसदार आहोत, त्याच घराण्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला जाण्यास निमंत्रण कशाला हवे. मला मुख्यमंत्र्यांनीच निमंत्रण दिले पाहिजे असा हट्ट कशाला,” असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
हेही वाचा >>> गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच ‘दुर्ग प्राधिकरणा’ची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!
“सातारच्या राजघराण्याच्या ताब्यात ते देवस्थान आहे. आपल्या देवीकडे, आपल्या देवस्थानाला जाण्यास निमंत्रण कशाला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनादेखील निमंत्रण गेले असावे. किल्ला आपला आहे, देवस्थान आपले आहे. वारसा आपला आहे, त्याला निमंत्रणाची वाट कशाला पाहायची,” असेही शिवेंद्रसिंह राजे उदयनाराजे भोसले यांना उद्देशून म्हणाले.
हेही वाचा >>> “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
दरम्यान, शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याव्यतिरिक्त साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. तर प्रतापगडावर झालेल्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमासाठी मला कोणाचाही निरोप आला नसल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.