छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना राज्य प्रस्थापित करण्यासाठी मदत केली. त्यांच्याबरोबर भागीदारी केली. याबद्दल इंग्रजांनी त्यांना बक्षीसी दिली हे आणि अशाप्रकारचे चुकीचे आणि चीड आणणारे लिखाण राहुल गांधी यांनी त्यांच्या समाज माध्यमावर केले असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी भाजपच्या खासदार म्हणून नाहीतर त्या घराण्यातील वारस म्हणून माझे मत आणि चीड व्यक्त करत असल्याचे सांगत उदयनराजे म्हणाले, की हिंदुस्तानवर आक्रमण करणाऱ्या सर्वांनी साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या, देशाची लूट केली. मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली आणि समाजावर अन्याय केला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढा उभारून स्वराज्य स्थापन केले. त्यांनी कोणाशीही तडजोड केली नाही. सर्वधर्मीयांना राज्यकारभारात सहभागी करून घेतले. त्यांना विचार दिला. त्या आधारावर त्यांनी समाजाची एकजूट करून परकीय आक्रमणे परतवून लावली. असे असताना राहुल गांधी महाराजांबद्दल अतिशय चुकीची विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमच्या कुलदैवतांची बदनामी करत आहेत.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

समाजामध्ये विचार, मतभेद आणि जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत असल्याची टीका उदयनराजे यांनी केली. राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करत असताना असे बेजबाबदार आणि अनैतिक कृत्य करत असल्याबद्दल संताप व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, की त्यांना देशातल्या महान युगपुरुषांबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तर त्यांना नक्कीच माहिती असणार. मग असे असतानाही ते त्यांच्या समाज माध्यमांवरून आदरयुक्त न बोलता चुकीची, त्यांची बदनामी करणारी माहिती का पसरवत आहेत. महाराजांनी इंग्रजांना राज्य प्रस्थापित करण्यासाठी मदत केली. त्यांच्याबरोबर भागीदारी केली. याबद्दल इंग्रजांनी त्यांना बक्षीसी दिली हे आणि अशाप्रकारची असत्य विधाने ते का करत आहेत. राहुल गांधींकडे युगपुरुषांबद्दल बोलताना कोणताही आचार विचार असल्याचे दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाहीतर देशाचे अभिमानस्थळ आहे. त्यांच्याबद्दल असे विचार व्यक्त होत असताना राज्यातील कॉग्रेसचे अन्य नेते, शरद पवारांसह सर्व विरोधक अद्याप गप्प का आहेत असा प्रश्न विचारत उदयनराजेंनी याबद्दल चीड व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale attack rahul gandhi over defamation of shivaji maharaj zws