राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. याच विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. असे असतानाच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी या सर्व वादावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करण्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र मी अमित शाह यांना लिहिणार आहे, असे उदयनराजे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकवेळा वेगवेगळी विधानं करण्यात आलेली आहेत. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी. म्हणूनच यांना विस्मरण होत असावे. अशी विधानं करणाऱ्यांमध्ये विकृती असावी. कदाचित त्यांचा अंतही होऊ शकतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.
हेही वाचा >>> राज्यपाल कोश्यारी, भाजपाविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक, म्हणाले “यांच्या बापाने…”
“वादग्रस्त वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे पद मोठे आहे. हे पद कोश्यारी यांना झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा,” असेही उदयनराजे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती संतापले?
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधान केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती हेदेखील संतापले आहेत. “सर्वांना उठसूठ शिवाजी महाराजच का दिसतात. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करतात. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबात विधाने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वादग्रस्त व्यक्ती महाराष्ट्रात का ठेवली आहे. त्यांना हटवण्याबद्दल याआधीही मागणी केली होती,” अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.