वाई : उदयनराजेंनी मनभेद विसरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. भाजप, शिवसेना शिंदेगट युती सरकारमध्ये सहभागी झाल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व मनभेद विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार फोनवरुन शुभेच्छा दिल्या. लवकरच प्रत्यक्षात भेटूनही त्यांना शुभेच्छा देणार असल्याचे खासदार उदयनराजे यांनी कास पठारावर पत्रकारांना सांगितले
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणापासून सातारा शहरा पर्यंत २९ किलोमीटर लांबीच्या नवीन जलवाहिनीच्या योजनेचे भूमिपूजन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, दिलीप छिद्रे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे सातारा विकास आघाडीचे सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा >>> “अर्थमंत्रीपदी अजितदादा, पण अंतिम निर्णय…”, खातेवाटपावरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना तुम्ही शुभेच्छा देणार का, असे विचारले असता खासदार उदयनराजे म्हणाले, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरु असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटू व चर्चा करु, असे सांगितले. त्यानुसार मी त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे. त्या दोघांमधील मतभेद सर्वज्ञात आहे. उदयनराजेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्याने दोघेही भेट झाल्यानंतर काय बोलणार याविषयी साताऱ्यात कुतूहल आहे.
हेही वाचा >>> संजय राठोड यांचे अन्न व औषध प्रशासन खाते काढून महत्व कमी केले, समर्थक नाराज
आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते साताऱ्यात १०७ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. कास धरणाच्या उंचीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे काम सर्वोत्तम दर्जेदार झाल्याबद्दल उदयनराजे यांनी समाधान व्यक्त केले. जलवाहिनीच्या योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सातारकरांना लवकरच जादा दाबाने आणि मुबलक पाणी येत्या काही वर्षात उपलब्ध होईल असे ते यावेळी म्हणाले. तसेच एक मेगावॅट वीज निर्मिती केंद्राचे सुद्धा भूमिपूजन उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. पावर हाऊस येथे दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सांबरवाडी येथे १६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, अशा १०७ कोटी कामांच्या भूमिपूजनाचा नारळ फुटल्याने विकास कामांना गती आली आहे.