आयकर विभाग (आयटी), केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) देशभर वेगवेगळ्या नेत्यांवर होत असलेल्या कारवायांवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले, एखादी चूक करणारा नेता ईडीला घाबरतो. चूक करणाऱ्यांना समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही. मी मागेही अनेकदा सांगितलं आहे की, जे लोक चुका करतात ते घाबरतात, अशा चुका करणाऱ्यांनी समाजकारणात राहू नये. बाकीच्या पक्षांची (विरोधी पक्ष) अवस्था तुम्ही पाहताय.
दरम्यान, उदयनराजे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही वक्तव्य केलं. उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची किती वाढ होतेय ते मला माहिती नाही. मी जे पाहतोय त्यानुसार सध्याच्या घडीला त्यांच्या पक्षाची घट होत चालली आहे. ही घठ का झाली? एकेकाळी राज्यात इतका प्रभावी असणाऱ्या या पक्षाची आज अशी अवस्था कशामुळे झालीय?
शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या चिन्हावरही उदयनराजे यांनी रविवारी (७ एप्रिल) प्रतिक्रिया दिली होती. उदयनराजे म्हणाले होते, “तुतारी हे चांगलं चिन्ह आहे. त्या पक्षाचे नेते पण मोठे आहेत. प्रत्येक नेतृत्वाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे उगाचं काही अर्थ लावू नका, तुतारीचे काय त्या आमच्या वाड्यात नेहमीच वाजतात.” उदयनराजेंना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहात का? त्यावर उदयनराजेंनी तुतारी शब्दाचा वापर करून शाब्दिक कोटी केली.
हे ही वाचा >> राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
उदयनराजे म्हणाले, मी राजकारणापेक्षा समाजकारणावर विश्वास ठेवतो आणि आजपर्यंत वाटचाल तत्वाने केली आहे. सर्व राजकीय पक्ष छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण मी तत्वनिष्ठ आहे. छत्रपतींची ध्येयधोरणे भाजप पक्ष अंमलात आणत आहे. तुतारी ही मंगल प्रसंगी वाजवितात. ज्या पक्षाचे ते चिन्ह आहे ते ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. पण तुतारी वाद्याचं म्हणाल तर ती आमच्या वाड्यावरसुध्दा वाजते.