साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडवण्याची स्टाईल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अलीकडेच सातारा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी कॉलर उडवून उदयनराजेंना आव्हान दिल्याची चर्चा रंगतेय. शरद पवार साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी कॉलर उडवून उदयनराजेंची हुबेहूब नक्कल केली. ही नक्कल करून शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर आता उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले यांना भाजपाने अद्याप लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का? त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आता तशी शक्यता नसल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच पत्रकार म्हणाले की, तुम्हीही कॉलर उडवणार का? त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडवून दाखवली. त्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकला होता.
दरम्यान, शरद पवार यांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार भोसले सध्या साताऱ्यात निवडणुकीची तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. लोकसभेबाबत प्रश्न विचारल्यावर माजी खासदार म्हणाले, मी साताऱ्याची लोकसभा निवडणूक लढणार म्हणजे लढणारच! यावेळी उदयनराजेंना विचारलं की, शरद पवारांनी साताऱ्यात तुमच्यासारखी कॉलर उडवून तुम्हाला आव्हान दिल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल. यावर उदयनराजे भोसले म्हणाले, मी त्यावर काय बोलणार. शरद पवार हे वडीलधारे आहेत. माझ्या बारशाचं जेवण जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलणार…आणि ते स्टाईल वगैरे काही नसतं.
हे ही वाचा >> शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडेंविरोधात उभा केला तगडा उमेदवार
“…तेव्हापासून कॉलर उडवण्याची स्टाईल सुरू झाली”
यावेळी उदयनराजे यांनी कॉलर उडवण्याची स्टाईल कशी सुरू झाली याबद्दलचा खास किस्सा सांगितला. उदयनराजे म्हणाले, मी एकदा कास पठारावर फिरण्यासाठी गेलो होतो. तिकडे यात्रा होती. यात्रेवेळी अनेकजण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची गॉगलची स्टाईल करत होते. त्या स्टाईलची बरीच चर्चा होती. माझा जीवलग मित्र युनूस त्यावेळी माझ्याबरोबर होता. तो मला म्हणाला राजे तुमची काय स्टाईल आहे. मी बराच वेळ विचार केला. आपली काय स्टाईल? मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, नेहमी लोकांच्या हिताचं काम केलं, हीच माझी स्टाईल. त्यावेळी युनूस म्हणाला काहीतरी स्टाईल पाहिजे. त्यावर मी म्हटलं, एवढा अधिकार आहे, कोणीही सांगू द्या, कुठंही, केव्हाही तयार आहे… असं म्हणत मी कॉलर उडवून दाखवली होती आणि म्हटलं This is called Style… (याला म्हणतात स्टाईल) तेव्हापासून ते सुरू झालं. त्यामुळे अनेकदा माझ्यावर टीकाही झाली. मी टीकाकारांना म्हटलं, हवं तर माझी कॉलर काढून घ्या… मात्र लोकांचा माझ्यावर जीव आहे तोवर ते प्रेम कोणी काढून घेऊ शकत नाही.