Udayanraje Bhosale on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली होती. संभाजीराजे यांनी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत देखील दिली आहे. दुसऱ्या बाजूला काही लोकांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला आहे. पाठोपाठ, भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावर भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमावी अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. तसेच उदयनराजे यांनी नमूद केलं की वाघ्या कुत्र्याबाबत इतिहासात कुठेही नोंद नाही.
दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही”, अशी खंत देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई जवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा युती सरकारने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन देखील केले होते. अद्याप या स्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यावरून उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते म्हणाले, “शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं मलाही निमंत्रण होतं. मात्र, अद्याप या स्मारकासाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही.”
उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
उदयनराजे भोसले म्हणाले, “मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवणार अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, या स्मारकासाठी अद्याप एक रुपयाचीसुद्धा तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने केवळ घोषणा केली नव्हती, तर भूमिपूजन देखील केलं होतं. मला त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. मला सरकारला सांगायचं आहे की त्या जागेवर स्मारक उभारता येत नसेल तर मुंबईसारख्या शहरात इतकी जागा आहे, कुठेही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारावं, राजधानीत शिवाजी महाराजांचा स्मारक हे झालंच पाहिजे.
शिवरायांच्या शासनमान्य इतिहास प्रकाशित करावा : उदयनराजे भोसले
“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना? मग अजून त्यांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही?” असा प्रश्न देखील उदयनराजे भोसले यांनी सरकारसमोर उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल वेगवेगळे दावे, प्रतिदावे केले जातात. त्यातून वाद निर्माण होतात. ते थांबावं यासाठी उदयनराजे यांनी शिवरायांचा व पर्यायाने मराठ्यांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.