Udayanraje Bhosale on Mahatma Phule: महात्मा जोतीराव फुले यांची १९८ वी जयंती (११ एप्रिल) आज राज्यभरात साजरी करण्यात आली. पुण्यातील फुले वाड्याला अनेक नेत्यांनी भेट देऊन महात्मा फुलेंना अभिवादन केले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावेळी फुले वाड्यात हजेरी लावली होती. तसेच माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी फुलेंच्या कार्याचा गौरव केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा, सर्व धर्म समभावाचा विचार जोतीराव फुलेंनी लोकांपर्यंत पोहोचवला. तसेच त्यांनी मुलींची शाळा काढत असताना एकप्रकारे थोरले प्रतापसिंह यांचे अनुकरण केले”, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले.
उदयनराजे भोसले नेमके काय म्हणाले?
महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना उदयनराजे भोसले म्हणाले की, महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह यांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती.
विरोधकांची टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजेंच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा फुलेंचे अनन्यसाधारण योगदान आपल्या सर्वांना माहीत आहेच. पण इतिहासाची विनाकारण खोडसाळपणे छेडछाड करण्यात येत आहे. उद्या उठून कुणी म्हणेल की, पुराणातील गार्गी नावाची महिला आधीच शिक्षिका झाली होती.
दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या या दाव्यावर अनेकांनी टीका केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, कुठलाही अभ्यास न करता किंवा इतिहास तज्ज्ञाचा सल्ला न घेता लोकसभेच्या खासदाराने अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, असे आमचे मत आहे. महात्मा जोतीराव फुलेंची आज जयंती असताना खासदार इतके बेजबाबदार कसे काय वागू शकतात? याबद्दल मी त्यांचा निषेध करतो.
आणखी एक ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनीही उदयनराजे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आज फुलेंची जयंती असताना उदयनराजेंनी इथे येऊन त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज इथे येऊन त्यांनी स्वतःच्या पूर्वजांचे महत्त्व सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा हा फुलेंनीच लिहिला होता. मात्र उदयनराजे नवा ऐतिहासिक शोध लावून महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासाला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रतापसिंह यांच्या शाळेचे पुढे काय झाले?
मंगेश ससाणे यांनी पुढे म्हटले की, प्रतापसिंह यांनी खरंच शाळा सुरू केली होती, तर त्या शाळेतील विद्यार्थिनी कोण होत्या? त्यांचे पुढे काय झाले? ही शाळा का सुरू राहिली नाही. त्यांच्या वंशजांनी शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले का? या प्रश्नांचीही उत्तरे द्यावी लागतील.