कराड :  लोकसभेच्या साताऱ्याच्या मैदानात ‘महायुती’चे खासदार उदयनराजे भोसले यांचेविरुध्द ‘महाविकास आघाडी’चे आमदार शशिकांत शिंदे या प्रमुख तगडया उमेदवारांचा जय-पराजय ठरवणारा या प्रतिष्ठेच्या लढतीचा कौल सीलबंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिम आकडेवारी.रात्री उशिरापर्यंत

उदयनराजे आणि शशिकांत शिंदे या दोन्हीकडून मतदानाची जोरदार रस्सीखेच होवून सायंकाळी पाच वाजपर्यंत किरकोळ अपवाद वगळता सरासरी ५४.११ टक्के मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे एकूण सरासरी झालेले मतदान व त्याची टक्केवारी रात्री उशिरा जाहीर होईल असे प्रशासनाने म्हटले आहे.

६२ टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज

लोकशाहीच्या या उत्सवात आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील  विधानसभेच्या कोरेगांव मतदारसंघात सर्वाधिक ५७.२१ टक्के तर, वाईमध्ये सर्वात कमी ५१.९ टक्के मतदान झाले. साताऱ्यात ५३.५५, पाटण ५०.३, कराड दक्षिण ५६.९९ तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ५४.८९ टक्के असे एकूण सरासरी ५४.११ टक्के मतदान  झाले. शेवटच्या तासाभरात हे सरासरी मतदान जवळपास सात टक्क्यांनी वाढून अंतिमतः ६२ टक्क्यांहून अधिक राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वरील सहापैकी सातारा, वाई, कोरेगाव, पाटण या चार मतदारसंघावर ‘महायुती’चे तर, कराड दक्षिण व कराड उत्तर या दोन मतदारसंघावर ‘महाविकास आघाडी’चे वर्चस्व आहे.

हेही वाचा >>> करमाळ्यात मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन हातोडीने फोडली, माथेफिरू तरूणाचे कृत्य

उत्सुकता आतापासूनच

साताऱ्याच्या रणांगणात पडद्याआडून झालेल्या साम, दाम, दंड, भेद याच्या वापराबरोबरच पक्ष नेतृत्वानेही रान उठवल्याने सातारच्या लढतीला कडव्या संघर्षाचे स्वरूप आले होते. त्यामुळे शरद पवारांच्या या बालेकिल्ल्यातील निकालाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहचली आहे.

बहिष्काराचे अस्त्र म्यान

गतखेपेस एकूण सरासरी ६०.४७ टक्के मतदान झाले होते. तर, याखेपेस उष्म्याचा उच्चांक असतानाही तुलनेत बरोबरीने मतदान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांसह  मतदारसंघातील अनेक गावांनी पाण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. परंतु, प्रशासनाची मध्यस्थी यशस्वी होवून अखेर इशाराकर्त्या मतदारांचे मतदान झाले. दरम्यान, मतदान प्रक्रियेत तांत्रिक दोष दिसून आलेत. मतदान ओळखपत्र असतानाही मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

हेही वाचा >>> सोलापुरात ५५ टक्के मतदानाचा अंदाज

कमळ फुलणार की तुतारी वाजणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘महायुती’च्या जवळपास प्रमुख नेत्यांच्या झालेल्या सभा आणि ज्येष्ठनेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या मातब्बर नेत्यांनी  सभांवर सभा घेवून ही जागा शरद पवार गटाकडे रोखण्यासाठी बांधलेला चंग. त्यामुळे साताऱ्यात प्रथमच कमळ फुलणार की तुतारी वाजणार? या औत्सुक्याचा फैसला येत्या चार जूनला होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale vs shashikant shinde satara registers 54 11 percent voting in 3rd phase of lok sabha poll zws
Show comments