उदयनराजे भोसले यांनी २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झाली आहे ती उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.
घरवापसी होणार का?
दरम्यान, यावेळी उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरवापसीविषयी देखील विचारणा केली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी दिलेलं उत्तर अनेक तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे. या प्रश्नानंतर काही सेकंदांचं मौन धरल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं. “शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे”, असं उदयनराजे म्हणाले.
वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “याविषयी लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेले प्रतिनिधी उत्तर देतील. राजेशाही असती, तर मी उत्तर दिलं असतं”, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. “प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. एकदा व्यक्ती सज्ञान झाली की काय करायचं हा निर्णय त्या व्यक्तीने घ्यायचा असतो. वाईन विक्री बंद करा किंवा सुरू ठेवा, लोकांनीच आपल्या शरीराचा वा आरोग्याचा विचार करायला हवा”, असं देखील उदयनराजे भोसले म्हणाले.