मागील काही दिवसात विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. अलीकडेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे बराच राजकीय वादंग निर्माण झाला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटातील नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता.
हा वाद सुरूच असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते, असं विधान उदयनराजे यांनी केलं. शिवाय त्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यातील शाही मशिदीची देखरेख आमच्या कुटुंबाकडून केली जाते, असं विधान उदयनराजे यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा…”, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचं टीकास्त्र!
महापुरुषांवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले, “सर्व धर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. त्यांनी कुठल्याही जाती-धर्मातील लोकांसोबत भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पार्टी आपापल्या सोयीने बोलत असते. पण शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांनी कधीही कुठल्या धर्माचा अनादर केला नाही. त्यांनी त्या काळात अनेक मशिदी आणि मंदिरं बांधली. साताऱ्यात शाही मशीद आहे. त्याची संपूर्ण देखरेख आमच्या कुटुंबाकडून होते. त्यामुळे यावरून कुठलाही वाद करू नये. कारण दोघंही स्वराज्यरक्षक होते, त्यांनी सगळ्या धर्माचा आदर केला म्हणून ते धर्मरक्षकही होते,” अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.