सातारा जिल्हा परिषदेच्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडीत आपल्या कार्यकर्त्यांला न्याय मिळाला पाहिजे या साठी खा. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नाडय़ा आवळल्या आहेत. सातारा विकास आघाडीसह आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या सूचनेशिवाय प्रचार करू नका असा आदेश दिला आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यपदाच्या निवडीत खा. भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे सदस्य रवी साळुंखे यांना खासदारांच्या सांगण्यावरून ते पद देण्यात आले. खा. भोसले यांनी त्या पूर्वी जिल्ह्यातील आमदारांना सावधानतेचा इशारा दिला होता. विधानसभेच्या तोंडावर खासदारांची नाराजी राष्ट्रवादीला न परवडणारी आहे. त्यामुळे त्यांनी मागितलेले पद देण्यात आले. आता दि. २ रोजी सभापती निवडी होणार आहेत. या निवडीतही सातारा विकास आघाडीला सभापतिपद मिळाले पाहिज,े अशी इच्छा खा. भोसले यांची आहे. आजपर्यंत भोसले यांना जिल्हा राजकारणातून बाजूला ठेवले गेले अशी तक्रार त्यांचे कार्यकत्रे करतात. जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राजकीय भूमिका घेताना त्यांना टाळले जाते अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. या सगळ्यावर जिल्हा परिषदेच्या निवडीत आपला अधिकार खा. भोसले यांनी दाखवून दिला. अध्यक्षपद तसेच सभापतिपदाच्या निवडी विधानसभा निवडीनंतर करायच्या असा डाव पदाधिकाऱ्यांचा होता. मात्र अध्यक्ष नंतर निवडा उपाध्यक्ष आजच निवडा असा पवित्रा या निवडीच्या दिवशी घेतला गेला. तसेच या बाबत जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करण्यासही काहीजण तयार झाल्यावर निवडी घेतल्या गेल्या. आता दि. २ रोजी सभापतिपदाच्या निवडीत हाडाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आपण प्रयत्न करणार असे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. या निवडीमुळे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना काम करण्यास मदत होईल असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.
खा. भोसले यांच्या या पवित्र्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराचे काय तसेच राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांची प्रचार मोहीम कशी राबवली जाणार असा प्रश्न सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुढे पडला आहे. कराड उत्तर, दक्षिण, कोरेगाव, सातारा, वाई मतदारसंघात त्यांची ताकद आहे. त्यांचे कार्यकत्रे त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे, राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे अशी मागणीही करत आहेत. त्यांचा काय विचार आहे हे अद्याप स्पष्ट नाही मात्र त्यांनी कोरेगावातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती तो मुद्दा ते किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्णही करतील. एकूणच सभापतिपदाच्या डावपेचात आज तरी सरशी उदयनराजे भोसले यांची झालेली दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा