सातारा : जुन्या दोन वादाच्या प्रकरणावरून सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळे खिंडवाडी येथील नवीन बाजार समितीचे वादावादीचे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले आहे, तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळाचे प्रकरण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.

साताऱ्यातील २०१७ मधील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानी उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री गोंधळ केला होता. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून न्यायालयात सुनावनी सुरू आहे. आणि खिंडवाडी (ता सातारा) येथील नवीन बाजार समितीच्या जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या कार्यकर्त्यासह व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये आज न्यायालयाने खिंडवाडी येथील नवीन बाजार समिती जागेच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे.

आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून २०१७ मध्ये शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरूची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील गोंधळ प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळे ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यांत सातारा जिल्हा सत्र न्यायालयात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली.

नवीन बाजार समितीच्या जागेवरून त्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा आज निकाली निघाला. मात्र उदयनराजे यांनी माध्यमांना सांगितले की आमच्यामध्ये बाजार समितीच्या जागेबाबत कोणताही वाद नव्हता.

Story img Loader