२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. यानंतर झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा यांचा पराभव केला होता. पराभवानंतर भाजपाने उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली होती. अशातच उदयनराजेंचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
“माझी निवडणुकीची हौस भागली,” असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
“माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजले नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं कळालं सुद्धा नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात,” अशी टोलेबाजी उदयनराजेंनी केली.
हेही वाचा : “बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार प्रचार करतील”, हसन मुश्रीफांचं मोठं विधान
“शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं,” असं उदयनराजेंनी सांगितलं.
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष”, राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पालिकेनं हद्दवाढ भागात आकारलेल्या घरपट्टीवरून लूट केल्याचा आरोप सातारा विकास आघाडीवर केला होता. यालाही उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सुविधा हव्यात पण घरपट्टी नको, मग सुविधा कशा मिळणार, सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बिनबुडाच्या आरोपांना भीक घालत नाही,” अशी टीका उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर केली होती.