Uddhav and Raj Thackeray Alliance : मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे) एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख राज व उद्धव ठाकरे यांनी तशी सूचक वक्तव्ये केल्यामुळे राज्यभर नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते यावर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. दोन्ही नेत्यांच्या चाहत्यांचं देखील तेच म्हणणं आहे. मात्र, त्यांच्या विरोधकांनी, शिवसेना (शिंदे) व भाजपाने यावर टीका-टिप्पण्या केल्या आहेत.

दरम्यान, राज व उद्धव ठाकरेंमधील ही युती कधी होणार? खरंच युती होईल का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. त्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर असून ते २९ एप्रिल रोजी मुंबईत परत येतील आणि स्वतः यावर बोलतील असं महाजन यांनी सांगितलं.

“संवेदनशील विषयावर कुठेही काहीही बोलू नका”, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

पार्ले पंचम या समूहाने विलेपार्ले व शिवसेना भवनासमोर (दादर) बॅनरबाजी केली आहे. या बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज व उद्धव यांनी लवकर व मनापासून एकत्र यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी असे बॅनर लावले आहेत. एका बाजूला ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद घालणारी बॅनरबाजी चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला एकत्र येण्याबाबत, युतीबाबत किंवा अशा कुठल्याही संवेदनशील विषयावर कुठेही काहीही बोलू नका अशा सूचना राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिल्या आहेत. परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर राज ठाकरे यावर सविस्तर भूमिका मांडतील असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

प्रकाश महाजन म्हणाले, “काल (सोमवार, २१ एप्रिल) संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून सांगणयात आलं की हा विषय (युती) खूप गंभीर आहे. या विषयावर आत्ता कुणीही बोलू नये. पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते अथवा नेत्यांपैकी कोणीही यावर बोलू नये. राज ठाकरे २९ एप्रिल रोजी त्यांचा परदेश दौरा आटपून मुंबईत येतील. त्यानंतर ते यावर बोलतील. या विषयावर राज ठाकरे यांच्याशिवाय इतर कोणी बोलणार नाही. तशा सूचना पक्ष नेतृत्वाने दिल्या आहेत. त्यामुळे या विषयावर आमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही.”