अलीकडेच मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला देशभरातील लाखो श्री सेवक खारघर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम भरदुपारी आयोजित करण्यात आला, शिवाय उपस्थित नागरिकांसाठी शेडची व्यवस्थाही करण्यात आली नाही. त्यामुळे उष्माघाताने सुमारे १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. संबंधित १४ जणांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याप्रकरणी विरोधकांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली आहे.
“महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची चौकशी करुन सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करावा” या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. राज्यपालांनी राज्याचे प्रमुख या नात्याने या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली. याबाबत आजच बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचे अभिवचन यावेळी राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिलं.
हेही वाचा- शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
या शिष्टमंडळात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, सचिन अहिर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, रमेश कोरगावकर, विलास पोतनिस, ऋतुजा लटके, सुनील शिंदे, प्रकाश फातर्पेकर,आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील व संपर्क प्रमुख संजय कदम आदि नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.