दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत परळीमध्ये संतप्त जमावाने थेट राज्यातील मंत्र्यांना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनाच घेराव घातल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंडे यांच्यावर बुधवारी दुपारी शासकीय इतमामात वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आलेले काही कार्यकर्ते सकाळपासून मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे संतप्त झाल्याचे जाणवत होते. सुरुवातीला काही जणांनी थेट पोलीसांवरच दगडफेक केली. तर अंत्यसंस्कार झाल्यावर आपापल्या वाहनाकडे परतणाऱया राज्यातील मंत्र्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना घेराव घातला. मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी या नेत्यांकडे केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज व्यक्त केली. संतप्त जमावाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर तुरळक दगडफेक केल्याचेसुद्धा समजते.
दिल्ली विमानतळाकडे जात असताना गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी एका इंडिका गाडीने धडक दिली होती. या अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी तपासाला सुरूवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा