शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आकाशपाताळ एक केल्याशिवाय राहणार नाही. सेनाप्रमुख व शिवसेनेची ऊर्जा असलेल्या शिवसैनिकांच्या हिंमत, शक्ती आणि ताकदीवर हेच स्वप्न पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले. सेनाप्रमुखांच्या निधनानंतर झालेल्या या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी राजकीय भाष्य करणार नाही, असे स्पष्ट केले. सीमालढय़ाला पाठबळ देण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात सोमवारी करवीर नगरीत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन केले. उण्यापुऱ्या दहा मिनिटांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. बाळासाहेबांच्या निधनाने मलाही दुख झाले आहे. मात्र शिवसैनिकांची भेट घेऊन संवाद करण्यासाठी इथे आलो आहे, असा उल्लेख करताच सभागृहात घोषणा सुरू झाल्या. राजकीय विधान करणार नाही, असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला. शिवसेनाप्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव आहेत, असा उल्लेख त्यांनी केल्यावर जोरदार टाळ्या व सेनाप्रमुखांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. भाषण थांबवित सेनाप्रमुखांच्या नावाचा जयघोष करण्यास त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे चांगल्या कामाची सुरुवात कोल्हापुरातून करीत असत. त्यांच्या बिंदू चौकातील सभांसह प्रत्येक दौरे लक्षवेधी ठरले आहेत. ही प्रथा आपणही पुढे सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरे या दैवताचा पुत्र होण्याचे भाग्य मला लाभले, असा भावनिक उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले, इथे कोल्हापुरात येऊन बोलतोय म्हणजे मला दुख झाले नाही, असे नाही. तर दुख गिळून लढायला तयार झालो आहे. सेनाप्रमुखांनी आपल्याला नेहमी लढायला शिकविले आहे. आपण रडत बसल्याचे त्यांना कदापिही आवडणार नाही. सेनाप्रमुखांच्या जाण्यानेही ते माझ्यामागे पूर्ण ताकदीने उभे आहेत याची खात्री पटली आहे. आपण दुख करून केवळ अश्रू गाळत बसलो तर हिरवा आंतकवाद व मराठी माणसांवरील अन्याय वाढेल. हे कदापि होता कामा नाही. यासाठी आपणा सर्वाना शक्तीनिशी प्रयत्न करावे लागतील. विधानसभेवर भगवा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे नमूद करीत त्यांनी आपला इरादा व्यक्त केला.